कोरोना लसीकरण; पहिला डोस न घेतलेले २४,७०१ जणं
रत्नागिरी:- कोरोनाचे बाधित अधूनमधून सापडत असल्याने आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहिमेला महत्त्व दिले जात आहे. बुस्टर डोससाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून पहिला, दुसरा डोस राहिलेल्यांनाही आवाहन केले जात आहे; परंतु अजूनही जिल्ह्यातील २४ हजार ७०१ जणांनी पहिला, तर १ लाख ७३ हजार ५९१ जणांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातील काहीजणं कोरोनामुळे गावाकडे आलेले मुंबईकर पुन्हा नोकरीसाठी परतले असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
गेली दोन वर्षे धुमाकुळ घालणार्या कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींचे दोन डोस देण्यास प्रारंभ केला गेला. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमुळे लसीकरण शिबिरांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याचे काम चांगले होते. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा पोचत होती. तिसर्या लाटेचा तितकासा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात झाला नाही. चौथ्या लाटेतही बाधितांचे प्रमाण नियंत्रणात आहे. सध्या पन्नास बाधित उपचाराखाली आहेत. १८ वर्षांवरील लोकांना पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस दिला जात आहे. जिल्ह्यात डोस घेण्यासाठी १० लाख ८१ हजार ९०० जणं पात्र होते. त्यातील १० लाख ५७ हजार १९९ जणांनी पहिला डोस घेतला असून ते प्रमाण ९७.७२ टक्के आहे. २.२८ टक्के जणांनी अजूनही पहिला डोस घेतलेला नाही. तसेच ९ लाख ८ हजार ३०९ जणांनी दुसरा डोस घेतला असून ते प्रमाण ८३.९५ टक्के आहे. प्रभाव ओसरल्यामुळे दुसरा डोस घेणार्यांचा टक्का घसरला आहे. अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसत आहे. केंद्र शासनाने बुस्टर डोसही देण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत ७१ हजार १४४ जणांनी याचा लाभ घेतला आहे. कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यामुळे डोस घेणार्यांकडून गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे.