रत्नागिरी:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा होणार की नाही, याबाबत स्पर्धकांमध्ये धाकधूक होती. १५ जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. आता २१ फेब्रुवारीपासून राज्यातील १९ केंद्रांवर ही स्पर्धा सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केल्याने रत्नागिरीसह राज्यातील नाट्यसंस्थांना दिलासा मिळाला आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटसह कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाने निर्बंध लागू केले होते. त्यामुळे १५ जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती; मात्र या स्पर्धा केव्हा होतील की नाही यावर कलाकारांसह नाट्यसंस्थामध्येही संभ्रम निर्माण झाला होता. जिल्ह्यातील संस्थांनी सराव सुरू ठेवला होता तरीदेखील मनात मात्र या स्पर्धेविषयी धाकधूक सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. राज्य शासनाकडून सांस्कृतिकसाठी नियमावली देण्यात आली. शासनाने एकेक पाऊल पुढे टाकले; मात्र हौशी मराठी नाट्यस्पर्धांबाबत तारीख पुढे गेल्याने संभ्रम निर्माण झाला होता. शुक्रवारी (ता. ११) ला सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी नाट्यस्पर्धा सुरू होण्याचे जाहीर केले. यामुळे नाट्यसंस्थांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सद्यःपरिस्थितीचा आढावा घेऊन हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी सुरवात होणार आहे. संगीत व संस्कृत नाट्यस्पर्धा ५ मार्चपासून तर बालनाट्य स्पर्धा १० मार्चला आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील विविध केंद्रांवर होणाऱ्या या हौशी मराठी नाट्यस्पर्धांच्या निमित्ताने सहभागी स्पर्धक संघ व कलाकारांचे अभिनंदन करून सर्व सहभागी संघांनी कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे; मात्र नाट्यसंस्थाचे नाटक केव्हा याबाबत कार्यक्रम पत्रिका अद्यापही उपलब्ध झालेले नाही दोन दिवसात ते होतील, असे येथील समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले.
नाट्यनिर्मिती प्रमुखाला फटका
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेसाठी जिल्ह्यातील रंगकर्मी तसेच नाट्यसंस्थांनी कंबर कसली आहे. सराव अंतिम टप्प्यात आहे; मात्र प्रशासनाच्या सावध हालचालींमुळे व नाट्यस्पर्धेची तारीख पुढे गेल्यामुळे निर्मितीप्रमुखाला आर्थिक फटका बसल्याची चर्चा आहे.