हातिवले टोलनाका अपघातप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ एका महिंद्रा मराजो गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मराजो गाडीतील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, गाडीतील चालक आणि इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात शुक्रवारी, ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१८ च्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी महिंद्रा मराजो (क्र. एमएच ०२/ई.डब्ल्यू/४७४८) हातीवले टोलनाक्याजवळ आली असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने समोर उभ्या असलेल्या ट्रक (क्र. एमएच १०/ए.डब्ल्यू/८१४४) ला मागून धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात मराजो गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीतील प्रवासी तृशांत सुरेश शेलार (वय ३२, रा. कास, ता. जावळी, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात गाडी चालक कुणाल शिवाजी साळुंखे (वय ३९, रा. मालाड, मुंबई) यांच्यासह हर्षदा कुणाल साळुंखे (वय २८, रा. मालाड, मुंबई), प्रीती राजेश नायडू (वय २८, रा. मालाड, मुंबई) आणि श्रीकांत नामदेव घाडगे (वय २८, रा. मालाड, मुंबई) हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलीस पाटील दीपक शांताराम धालवलकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी कुणाल साळुंखे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ), (ब), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.