हातखंबा येथील तरुणाचा बावनदीत बुडून मृत्यू

५ तासांच्या प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील बावनदीमध्ये बुडून ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सचिन सुरेश सनगरे असे या मृत तरुणाचे नाव असून, ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा सनगरेवाडी येथील सचिन सुरेश सनगरे आणि मिलिंद पांडुरंग सनगरे हे दोघे सोमवारी दुपारी ‘गावात जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, गावात न जाता ते थेट बावनदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. बावनदी धरणाच्या खालच्या बाजूला आणि पुलाच्या वरील भागात असलेल्या एका खोल डोहात सचिन सनगरे पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलवर ओढला गेला आणि बुडू लागला.

​सचिनला बुडताना पाहून किनाऱ्यावर असलेल्या मिलिंद सनगरे याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने सचिन सनगरे याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

​या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा रितसर पंचनामा केला असून, सध्या या घटनेची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हातखंबा सनगरेवाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.