हातखंबा जि.प. गटात ‘हाय व्होल्टेज’ लढत

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण सध्या कमालीचे तापले असून उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना विरोधकांपेक्षा आता त्यांच्या कट्टर समर्थकाकडून मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हातखंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेले माजी सभापती परशुराम मारुती कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट बंडाचे निशाण फडकवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा जिल्हा परिषद अनुसूचित जाती गटातून परशुराम कदम यांच्या नावाला स्थानिक पातळीवर मोठी पसंती होती. खुद्द सामंत यांनी त्यांना उमेदवारीचे स्पष्ट आश्वासन दिले होते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, ऐनवेळी अंतर्गत राजकारणामुळे कदम यांना डावलून सुयोग नंदकुमार कांबळे यांना शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे कदम यांची नाराजी टोकाला पोहोचली आणि त्यांनी सामंतांची साथ सोडत अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

परशुराम कदम हे साधे कार्यकर्ते नसून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि समाजकल्याण सभापतीपद यशस्वीपणे भूषविले आहे. त्यांच्या या बंडखोरीमुळे उदय सामंत यांचे अनेक जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आता कदम यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. हा सामंत यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

परशुराम कदम यांना पराभूत करण्यासाठी सामंत समर्थक आता सक्रिय झाले आहेत. मात्र, ९ फेब्रुवारीला लागणाऱ्या निकालात हातखंब्याचा गड कोण सर करणार आणि या बंडखोरीचा फटका आगामी विधानसभा राजकारणावर किती होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​कदम यांच्या उमेदवारीमुळे या गटातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आता मुख्य लढत खालील उमेदवारांमध्ये होणार आहे:
​सुयोग नंदकुमार कांबळे – शिवसेना (शिंदे गट)
​परशुराम मारुती कदम – अपक्ष (बंडखोर)
​मुकुंद सुजाता यशवंत सावंत – अपक्ष