राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत हॉट सीट मानल्या जाणाऱ्या हातखंबा जिल्हा परिषद गटात आज चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या असून, दुपारी १२:३० वाजेपर्यंत सुमारे ३५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाचा हा वाढता टक्का पाहता निकालात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही निवडणूक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सामंत यांचे नेतृत्व या गटात पणाला लागले असून, महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांच्या विजयासाठी खुद्द सामंत यांनी ताकद लावली आहे.
या निवडणुकीत खरी रंगत आली आहे ती अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांच्यामुळे. कदम हे एकेकाळी उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आणि खंदे शिलेदार मानले जात होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे या गटात आता ‘नव्या’ विरुद्ध ‘जुन्या’ सहकाऱ्यामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असून, वाढलेली ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा आता हातखंबा परिसरात रंगू लागली आहे. मतदारांचा हा उत्साह पाहता सायंकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी मोठी वाढण्याची शक्यता आहे.आता या चुरशीच्या लढतीत मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.









