हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी

फोर व्हिलर ताब्यात, गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजीचा प्रकार घडला असून, किनाऱ्यावर स्टंट करणारी चारचाकी (फोर व्हिलर) गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक दापोली तालुक्यात दाखल झाले असले तरी, काहीजणांच्या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

हर्णे किनाऱ्यावर काही पर्यटकांनी आपल्या वाहनांसह समुद्रकिनारी प्रवेश करून स्टंटबाजी सुरू केली. भरती-ओहोटीचे वेळापत्रक माहित नसल्याने काही गाड्या किनाऱ्यावरच पाण्यात रुतून बसल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकारांमुळे किनाऱ्यावरील अन्य पर्यटकांचा प्रवास आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

जिल्हा पोलीस दलाने यापूर्वीच समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घातली होती. तरीदेखील काही पर्यटकांनी नियमांकडे दुर्लक्ष करून हुल्लडबाजी केली. स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित फोर व्हिलर ताब्यात घेतली असून, चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली परिसरातील सर्व प्रमुख बीचेसवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, अशा प्रकारे स्टंटबाजी करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांकडून देण्यात आले आहेत. स्थानिकांनी पर्यटन वाढावे पण शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने यासाठी प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.