आजपासून आरंभ; मत्स्य विभागाकडून पथकांची नियुक्ती
रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे पर्ससिननेट मासेमारीला आज 1 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; मात्र पहिल्या दिवशी समुद्रावर स्वार होणार्या मच्छीमारांना खवळलेल्या समुद्राचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी बहूतांश मच्छीमार सज्ज झाले आहेत.
डॉ. सोमवंशी समितीच्या शिफासशीनुसार 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन, रिंगसीन (मिनी पर्ससीन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससीन परवानेधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आले होते. 500 मीटर लांब, 40 मीटर उंची, 25 मिमीपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा कालावधी निश्चित करुन दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे. मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंदही ठेवण्यात आली. त्याचा आर्थिक भुर्दंड मच्छीमारांना बसला होता. गतवर्षी सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ईपास काढण्यापासून त्यांना क्वारंटाईन ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. यंदा कोरोनाचे नियम शिथिल असल्यामुळे खलाशांना आणण्यात अडथळे आले नाहीत. आठ दिवसांपुर्वीच कर्नाटक, ओरीसा, बीहारसह नेपाळमधून अनेक खलाशी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या 247 आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातच या नौका सर्वाधिक आहेत. हवामान विभागाकडून 4 व 5 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली आहे; मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. कालपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. हलके वारेही वाहत असल्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे पर्ससिननेटच्या बहूतांश नौका समुद्रात रवाना होतील असे चित्र आहे.