स्वयंसेविकेला शाळेत कोंडून ठेवणार्‍या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर:- शाळेतील सहभोजन कार्यक्रमानंतर सभागृहाची साफसफाई करणाऱ्या एका महिला स्वयंसेविकेला हॉलमध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना नाटे येथे घडली आहे. याप्रकरणी नाटे नगर विद्यामंदिर शाळेच्या शिपायाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कीर्ती किशोर बांदकर (३९), रा. नाटे बांदचावाडा, या १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान नाटे नगर विद्यामंदिर शाळेत होत्या. शाळेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा सहभोजन कार्यक्रम असल्याने त्या पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी गेल्या होत्या.
​सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सर्व जेवणे आटोपल्यावर कीर्ती बांदकर या शाळेच्या सभागृह (हॉल) हॉलमध्ये साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे शिपाई रविकुमार भगवान धामापूरकर (५१), रा. नाटे गणेशनगर, तेथे आले. त्यांनी फिर्यादीला “तुम्ही एकटेच साफसफाई करणार का?” असे विचारले आणि हॉलच्या बाहेर गेले. त्यानंतर काही वेळातच बाहेरून हॉलची कडी लावून फिर्यादीला आतमध्ये कोंडून ठेवले आणि त्यांच्या बाहेर जाण्यास प्रतिबंध केला.

​या प्रकारानंतर फिर्यादीने २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी शिपाई रविकुमार धामापूरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन आणि शैक्षणिक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नाटे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.