स्मारकांच्या विकासासाठी लोकसहभाग; महाराष्ट्राची विशेष योजना

रत्नागिरी:- महाराष्ट्राचे वैभव असलेल्या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन दुरुस्ती, देखभाल, सुशोभीकरण व विकासकामासाठी आता सार्वजनिक सहभाग मिळवता येणार आहे. पुरातत्त्व विभागाने त्यासाठी महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक संगोपन ही योजना अंमलात आणली आहे. वारसा जतनाची जाणीव, त्याचे महत्त्व जनमानसात रुजवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांचे जतन आणि संवर्धन करू इच्छिणाऱ्या संस्थांना, व्यक्तींना, कॉर्पोरेट क्षेत्रांना, विश्वस्त मंडळांना आणि याविषयी अभ्यास असणाऱ्या व्यक्तींना सहभाग घेता येणार आहे.

नुकतीच याची घोषणा करण्यात आली असून रत्नागिरी पुरातत्व विभागाने याची माहिती दिली आहे. ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या स्मारकांचे जतन व पुनरुज्जीवन करून सध्याच्या व पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि कलेच्या उदंड वारशाचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तूशास्त्र अवशेष अधिनियम, १९६०च्या १५व्या कलमातील तरतुदीनुसार पुरातत्व विभागाअंतर्गत ‘महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन, दुरुस्ती, देखभाल, सुशोभीकरण व विकासकामासाठी सार्वजनिक सहभाग मिळवणे व वारसा जतनाची जाणीव, त्याचे महत्व जनमानसात रुजवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सहभागातुन या स्मारकांचे जतन होणार आहे.