रत्नागिरीः– रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे सोमवार २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने शनिवारी यासंदर्भात अधिकृत सूचना जारी केली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. भविष्यात ऐन उन्हाळ्यात तांत्रिक बिघाड होऊन पाणी टंचाई भासू नये, यासाठी ही ‘प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स’ मोहीम राबवली जात आहे. या कामासाठी जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशनवरील यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे.
सोमवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने मंगळवारी सकाळी देखील पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना रविवारी पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन केले आहे. तसेच पाणी काटकसरीने वापरावे, नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
रत्नागिरी शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पाणी पुरवठा यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी ही दुरुस्ती अनिवार्य असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वेळेत पाणी साठवून गैरसोय टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.









