रत्नागिरी:- शहरातील नव्याने केलेल्या रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. शहराच्या खालच्या भागात तर रस्तेच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना जाहिद खान कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र, या कंपनीने या सुचनांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने रनप प्रशासनाने जाहिद कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच नादुरुस्त रस्ते दुरुस्त करून त्याचा खर्च संबंधित कंपनीच्या बिलातून वसूल करण्यात येणार आहे.
शहराच्या पाणी योजनेच्या खोदाईमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांचे एप्रिल महिन्यापासून डांबरीकरण हाती घेण्यात आले. मात्र अवघ्या काही महिन्यातच नव्याने केलेल्या रस्त्यांची पुरती दैना झाली. विशेष करून शहराच्या खालच्या भागातील रस्ते नव्याने झाले की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी रनप प्रशासनाने ठेकेदारांवर टाकली.
मात्र वारंवार सूचना करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्या प्रकरणी ठेकेदार जाहिद खान कंपनीला रनप प्रशासनाने नोटीस बजवली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते व्यवस्थित व्हावेत यासाठी रनप रस्ते स्वतः दुरुस्त करून त्याची रक्कम जाहिद खान कंपनीच्या बिलातून वळती करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.









