सुवर्णकारांचा संप जिल्ह्यात यशस्वी

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; हॉलमार्किंगविरोधात निषेध

रत्नागिरी:- ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीत केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णकारांनी सोमवारी (ता. 23) एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्याला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष खेडेकर यांनी दिली.

रत्नागिरी सराफ सुवर्णकारसंघाकडून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष खेडेकर, रोहित वीरकर, प्रमोद वैद्य, निलेश जैन, अरविंद जैन, ऋषिकेश वीरकर, विशाल खेडेकर, मनीष जैन, भुपेश ओसवाल आदी उपस्थित होते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले आहे. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती; परंतु बीआयएसने शुद्धतेच्या 4 प्रमाणित शिक्क्यामंध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची पध्दत राबविण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर ही पध्दत लागू करताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल केले गेले. त्यामुळे व्यापार्‍यांचे काम वाढले. याच निषेधासाठी राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनतर्फे लाक्षणिक संपाची हाक दिली होती. त्यानुसार सोमवारी दिवसभर सराफी पेढ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. संपाबाबतची माहिती एक दिवस आधी सराफी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली नाही, असे श्री. खेडेकर यांनी सांगितले.