सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला यशस्वी

सीईओ डॉ. जाखड; आदर्श महिलांचा सन्मान 

रत्नागिरी:- सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी उघडले. त्यामुळेच यशस्वी महिला म्हणून आपण जगात वावरत आहोत. अंगणवाडीपासून ते बचत गटातील सर्वच महिलांनी कोरोनातील कठीण काळात प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन खूप चांगले काम केले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले.

जागतिक कन्या दिन बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेअंतर्गत व क्रांती बाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जन्मदिनानिमित्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम जिल्हा परिषद शिक्षण व महिला बाल विकास विभागातर्फे करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कलामपुरकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उप शिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी श्री. जवादे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रातिनिधिक स्वरूपात अंगणवाडी ताई, शिक्षिका, महिला डॉक्टर, बचत गटाच्या महिला  यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नंदीनी घाणेकर म्हणाल्या की, खूप जणी सावित्रीच्या लेकी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कामाची माहिती आपल्याला नसते. स्त्रीने स्त्रीची मैत्रीण व्हावी शत्रू होऊ नये. कारण पुढच्या पिढीला आपले आदर्श आपल्याला ठेवता आले पाहीजेत. प्रत्येक पुरुषानेही महात्मा फुले झाले पाहिजेत. सगळ्यांनी स्त्रीचा आदर केला पाहिजे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापुरे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले या कणखर खडतर प्रवास करत बालविवाह सती प्रथा मोडून त्यांनी काढली. त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना साथ दिली. स्त्री पुरुष समानता आणली एकमेकांना घेऊन पुढे जाणं हीच स्त्री-पुरुष समानता आहे.स्वातंत्र्य आचरणाने असावं विचाराने पुढे जावो.