चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे येथे निंदनीय घटना घडली आहे. सावर्डे येथील ग्रामदैवत केदारनाथ मूर्तीची अज्ञाताने विटंबना केल्याने सावर्डेसह परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घेटनेच्या निषेधार्थ सावर्डेवासीयांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. ग्रामस्थांना शांततेचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सावर्डे येथील श्री देव केदारनाथचे जागृत मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. शुक्रवारी सकाळी येथील पुजारी देवाची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मूर्तीची विटंबना केल्याचे लक्षात आले. ही बाब त्यांनी तत्काळ गावातील मानकरी व ग्रामस्थांच्या सांगितली. तसेच सावर्डे पोलीस स्थानकाला याची कल्पना देताच पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
केदारनाथ मंदिरात ज्या कोयत्याने श्रीफळ वाढविले जाते त्या कोयत्याने पाषाण (दगडी आसन) आणि मूर्तीवर घाव केल्याचे दिसून आले. तसेच अज्ञाताने घाटाला टॉवेल बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच मरीआई मंदिरासमोर सणाच्यावेळी वाहिलेली निशाण केदारनाथ मंदिराच्या चव्हाट्यावर आणून जाळण्यात आली होती. गावात आणि परिसरात हा प्रकार समजताच शेकडो ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली. अनेकांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला. सावर्डे बाजारपेठ व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे बंद ठेवून निषेध व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावर्डे पोलीस ठाण्यात प्रतिष्ठीत ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन शांत राहण्याचे आवाहन केले.
श्री देव केदारनाथ मंदिरात अज्ञाताने घृणास्पद कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रामस्थांनी देव केदारनाथची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा केली. यानंतर श्री देव केदारनाथचे अनेकांनी दर्शन घेतले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.