अपघातानंतर चालक पसार, दोन जण जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे बाजारपेठेत असलेल्या पुलावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले असून, धडक देऊन चालक कंटेनरसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही घटना १० जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली.
या अपघाताबाबत विनोद विष्णू निकम (वय ४०, सध्या रा. सावर्डे, मूळ रा. कटगिरी, ता. संगमेश्वर) यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद निकम हे १० जुलै रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८/४/५१२६) अनिल सीताराम डिके (वय ५६) यांना सोबत घेऊन कोंडमळा दिशेने जात होते. सावर्डे बाजारपेठेतील साईश्वरी हॉस्पिटलजवळील पुलावर आले असताना, मागून गोवा बाजूकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कंटेनर चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये दुचाकीवरील विनोद निकम आणि अनिल डिके हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता, तसेच थांबा न घेता आपला कंटेनर मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात पळवून नेला.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या अज्ञात कंटेनर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.









