रत्नागिरी:- मुंबईहून खारेपाटण येथे जाणाऱ्या मोटारीला संगमेश्वर तालुक्यातील मेढे-साखरपा रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ठाणे येथील पेडणेकर कुटुंबियांतील तीन जण जखमी झाले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैजयंती शशिकांत पेडणेकर (५०, रा. ठाणे), शोभा श्रीधर पेडणेकर (६५, रा. डोंबिवली-ठाणे) आणि विनोद शशिकांत पेडणेकर (वय २८, रा. ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास मेढे-साखरपा रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक विनोद पेडणेकर हे मंगळवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास मोटार घेऊन मुंबईहून आपल्या गावी खारेपाटण येथे जात होते. मोटार घेऊन ते साखरपा-देवरुख ते वाटूळ (ता. लांजा) या मार्गावरुन जात असताना मेढे-साखरपा येथील रस्त्यावर पुढे जाणाऱा डंपर अचानक थांबला. यावेळी विनोद पेडणेकर यांनी मोटारीला ब्रेक केला मात्र मोटार घसरुन डंपरला मागून धडक दिली. या अपघातमध्ये पेडणेकर कुटुंबियातील तीघेजण जखमी झाले. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले करण्यात आले आहे.