रत्नागिरी:- साखरपा गोवरेवाडी येथे सार्वजनिक विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. उपसरपंच ओमकार कोलते यांनी ही बाब वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
शुक्रवारी रात्री ११ वा. साखरपा गोवरेवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे उपसरपंच ओमकार संजय कोलते यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब तातडीने परिमंडळ वनाधिकारी तौफिक मुल्ला यांना कळवली. त्यानुसार आज सकाळी परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वनाधिकारी देवरूख तौफिक मुल्ला, वनरक्षक आरवली आकाश कडूकर, वनरक्षक दाभोळे अरुण माळी, वनरक्षक राजाराम पाटील, वनरक्षक रणजित पाटील, वनरक्षक संजय रणधीर यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गोवरेवाडीस पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये बिबट्या मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला. परिसराची पाहणी करता विहिरीला ३ फूट उंचीचा कठडा असून, विहीर सुमारे ५० फूट खोल आणि, त्यामध्ये १० फुटापर्यंत पाणी आहे तर रूंदी १८ फूट आहे. ही विहीर ही शेडनेटच्या साहाय्याने झाकून घेतली होती. गेले तीन-चार दिवस कोणीही ग्रामस्थ या विहिरीकडे फिरकले नाही, असे सरपंच यांनी सांगितले. त्यानंतर विहिरीमध्ये उतरून स्थानिक ग्रामस्थ दीपक गोवरे, प्रकाश गोवरे, ग्रामपंचायत शिपाई कृष्णा गोवरे यांच्या साहाय्याने दोरी बांधून विहिरीबाहेर काढले. मृत बिबट्या नर असून, अंदाजे वय ३ ते ४ वर्षे आहे. तद्नंतर देवरूख येथे पशुधन विकास अधिकारी कदम यांच्यामार्फत मृत बिबट्याचे विच्छेदन करून सर्व अवयवासह दहन केले. या बिबट्याचा मृत्यू हा भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक मत परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांनी व्यक्त केले.