Wednesday, July 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी सांडपाणी वाहून नेणाऱ्या सात नाल्यांवर रनप उभारणार मल शुद्धीकरण केंद्र

सांडपाणी वाहून नेणाऱ्या सात नाल्यांवर रनप उभारणार मल शुद्धीकरण केंद्र

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या समुद्रकिनाऱ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या हद्दीत शहराचे पाणी समुद्रत वाहुन नेणाऱ्या ७ नाल्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक मल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या कडक निकषांनुसार सांडपाणी पूर्णपणे शुद्ध केल्यानंतरच ते समुद्रात सोडले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ८१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, यामुळे रत्नागिरीचा समुद्र स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे.

या प्रकल्पाचे नियोजन आणि तांत्रिक काम वेगाने सुरू झाले आहे. नवी मुंबई-बेलापूर येथील प्रसिद्ध ‘एस इंजिनिअरिंग कन्सल्टंट’ कंपनीकडे याचे काम सोपवण्यात आले आहे. या कंपनीमार्फत रत्नागिरी शहर आणि किनारपट्टीच्या भागाचा सविस्तर सर्व्हे पूर्ण झाला आहे. शहरात कोणत्या ठिकाणी सांडपाणी गोळा होते आणि ते कुठून समुद्रात जाते, याचा अभ्यास करूनच या ७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मत्स्य उद्योग, भगवती बंदर, पेठकिल्ला झाडगाव, मजगावरोड, राजीवडा, निवखोल-आदमपूर आणि नाचणे रोड येथील नाल्यांवर हे सात प्रकल्प होणार आहेत.

या संपूर्ण प्रकल्पासाठी ८१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या मोठ्या प्रकल्पासाठी रत्नागिरी नगरपालिकेवर आर्थिक भार पडणार नाही. शासनाच्या ‘नगरोत्थान’ किंवा ‘स्वच्छ भारत अभियान’ या योजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या योजनेच्या नियमानुसार प्रकल्पासाठी लागणारा तब्बल ९० टक्के निधी शासन देणार असून, उर्वरित अवघा १० टक्के निधी रत्नागिरी नगरपालिकेला उभा करावा लागणार आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण न पडता शहराचा हा गंभीर आणि मोठा प्रश्न सुटणार आहे.

अशी असणार कार्यपद्धती

या प्रकल्पांतर्गत शहराच्या विविध भागांत आधुनिक पंपिंग स्टेशन उभारले जातील. शहरातील सांडपाणी वाहिन्यांद्वारे या पंपिंग स्टेशनवर आणले जाईल आणि तिथून ते मलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. पाणी पूर्णपणे शुद्ध आणि प्रदूषणमुक्त झाल्याची खात्री पटल्यानंतरच ते समुद्रात सोडण्यात येईल.