सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेले दोन दिवस सरींचा पाऊस सरु आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक गणपतीपुळे किनारी दाखल झाले आहेत. शनिवार, रविवारी जोडून सुट्ट्या असल्यामुळे किनाऱ्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी आहे. सध्या समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात पोहण्यासाठी उतरणाऱ्यांवर अंकुष ठेवताना जीवरक्षकांसह स्थानिक व्यापाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गणपतीपुळेसह आरे-वारे, नेवरे किनारी पर्यटकांचा अधिक राबता असून पर्यटक बिनधास्तपणे सुमुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी सरसावत आहेत.

शाळा, महाविद्यालयं सुरु झाली असली तरीही शनिवार, रविवारी जोडून येणाऱ्या सुट्टीला पर्यटकांचा कोकणातील राबता कमी झालेला नाही. पावसाचा आनंद घेण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच पर्यटक गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांच्या ठिकाणी दाखले झाले होते. सायंकाळी आरे-वारे येथून मावळतीचा सुर्य पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. कोकणात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असून उन-पावसाचा खेळ सुरु झालेला आहे. दिवसातून एखादी सर पडून जात असल्याने वातावरणही पर्यटनाला पोषक असेच आहे. त्याचा आनंद समुद्रकिनारी घेण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. यामध्ये सर्वाधिक नवविवाहीत जोडपी, तरुण-तरुणी यांचा समावेश आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी युवा पिढी पाण्यात उतरताना दिसत आहे. भरतीच्यावेळी पाण्यात अचानक भोवरा तयार होत असल्याने त्या पर्यटकांचा बिनधास्तपणा जीवावर बेतणाराही ठरत होता. किनाऱ्यावरील काही स्थानिक व्यावसायीक, जीवरक्षक त्यांना याची कल्पना देतात, परंतु त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते.

आरे-वारे येथे काल (ता. २१) सायंकाळी दोन पर्यटक खाडीच्या मुखाशी पोहत होते. हलका वारा आणि भरती यामुळे खाडीच्या मुखाजवळ लाटांचा जोरही वाढलेला होता. तिथे भोवरा तयार होत असल्याने त्या दोन पर्यटकांना पोलिसपाटील आदेश कदम यांनी सतर्क केले. किनाऱ्यावरुन शिट्ट्या वाजवून धोक्याची सुचना पाटिल वारंवार देत असतात. तरीही पर्यटक पुन्हा त्याच ठिकाणी जात असल्याचे दिसत आहे. सायंकाळी किनाऱ्यावरील पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने सुट्टीच्या दिवशी पोलिसांची गस्त सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. तसे केले तर धोका पत्करुन समुद्रात उतरणाऱ्यांवर अंकुश बसेल. अन्यथा दुर्घटना झालेल्या घटनांचा आकडा आणखी वाढेल अशी भितीही व्यक्त केली जात आहे.