रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची रत्नागिरी तालुक्यात युतीबाबत दोन दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे. तालुक्यातील २९ पैकी सुमारे आठ सरपंचपदासाठी भाजपचे उमेदवार असा प्रस्ताव बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपला अधिक जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या जागावाटपावर अडले युतीचे घोडे अडले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करताना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौर्यावेळी सांगितले होते. त्यानुसार भाजपकडून सुरवातीला स्वबळाचा नारा दिला गेला; परंतु बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी तत्काळ भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत युती करण्याबाबतचा प्रस्तावही ठेवला होता. त्यावर अंतिम निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाणार होता. मंत्री सामंत हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते असल्यामुळे रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तालुक्यातील २९ पैकी किती ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करणार याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत.
भाजपकडूनही गेल्या दोन दिवसात युतीसाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. सुरवातीला भाजपने ९ ठिकाणी सरंपच निवड करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून आठ जागा भाजपला देण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरीत भाजप-सेना युती निश्चित असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. फक्त जागावाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात ठरवला जाणार आहे.
सरंपचपदाबरोबरच सदस्यांच्या जागावाटपाचा निर्णय हा स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून घेतला जाईल. गावाचा विकास लक्षात घेऊन कोणताही गोंधळ होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. याबाबत मंत्री सामंत यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी असे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शह देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही जोरदार बांधणी सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार असून, विभागप्रमुखांवर जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, अशी स्थिती रत्नागिरी तालुक्यात निर्माण झाली आहे.