सरकारी कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर

रत्नागिरी:- नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत.  या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.  राज्य शासकीय कर्मचा-यांच्या दोन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे.  या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत.

विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. संपात सहभागी होणा-या कर्मचाऱ्यांसंदर्भात ‘काम नाही वेतन नाही’  हे धोरणा राबवण्यात  येणार आहे.  संपाची घोषणा केल्याने कर्मचारी आणि अधिकारी यांची रजा रद्द करण्यात यावी अशी सूचना परिपत्रकातून देण्यात आली आहे. संप सुरु झाल्यानंतर दुपारी 12 आणि 2 वाजता संपाच्या संदर्भात माहिती मंत्रालयात कळवण्यात यावी, असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी  पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार, मुख्य सचिव आणि कर्मचारी आणि अधिकारी संघटना उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 7 नंतर सह्याद्रीवर बैठक आहे. जर तोडगा निघाला नाही तर कर्मचारी संपावर जाणार आहे.