पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी राहणार लक्ष: पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी:- जिल्ह्याला १८० किलोमिटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलिसांना गस्त घालणे शक्य नाही. मात्र पर्यटकांची गर्दी होणाऱ्या भागात आणि धबधब्यांच्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणी माहिती फलक लावण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत, असे जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.
मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडत असून समुद्र खवळलेला आहे. काल (ता. १९) आरे-वारे किनारी चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. या किनारी आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या असून समुद्र आणि खाडी एकत्र असल्याने त्या भागात पाण्याला प्रचंड करंट असतो. त्या भागात पोहण्यासाठी पर्यटकांनी जाऊ नये, असे वारंवार सांगितले जाते. परंतु अतिउत्साहाच्या भरात स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत पर्यटक पोहायला जातात आणि जीव धोक्यात घालतात.
सध्या सर्वत्र पावसाळी पर्यटनाचा जोर असून समुद्रकिनारे, धबधबे याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक भूमिका घेतली आहे. याबाबत पोलीस अधिक्षक बगाटे म्हणाले, आरे-वारे किनारी पोहायला गेलेल्या पर्यटकांना धोक्याची सूचना देण्यासाठी किनाऱ्यावरून शिट्टी वाजविली होती. परंतु त्याकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दुर्घटना घडली. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी धोकादायक किनारे असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासनाला सूचना फलक लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच गर्दीच्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंगही सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यासह धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये. मुसळधार पावसामुळे धबधब्यांचे पाणी अचानक वाढते. ही बाब तेथे पोहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे दुर्घटना घडतात. हे टाळण्यासाठी पर्यटकांनी पावसाळ्यात अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.