संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन: ना. सामंत

रत्नागिरी:- संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे महायुतीचे नेते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. भाजपच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीच्या धर्तीवर आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकांचा उद्देश महायुतीला अधिक बळ देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणे हा असल्यो राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत सांगितले.

शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मविआच्या शिष्टमंडळावर टीका केली. लोकसभा आणि विधानसभेला काही जमले नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जमतंय का? हा केविलवाणा प्रयत्न आहे. विशेषतः, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आव्हान दिले की, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या घाणेरड्या ट्विटचे आधी उत्तर द्यावे आणि मग निवडणूक आयोगाला भेटावे असाही उपरोधिक टोला लगावला. कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आम्ही ‘स्वबळ‘ (स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भाषा) सारखी विधाने करत असतो. पण शेवटी तिघे (महायुतीचे प्रमुख नेते) जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल, असेही त्यांनी या संदर्भात नमूद केले. या बैठकांच्या माध्यमातून महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधील समन्वय वाढवून आगामी निवडणुकीत ‘भगवा फडकवण्या‘च्या भूमिकेला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार आणि महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवू, अशी महायुतीची भूमिका राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.
ठाण्यात सुरू असलेल्या ‘उबाठा-मनसे‘च्या मोर्चांवर भाष्य करताना सामंत म्हणाले की, हे सगळे प्रयोग लोकसभा आणि विधानसभेला करून झालेले आहेत. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न असून त्यांना यश मिळणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, जी लोकं बेस्टच्या 12 हजार मतांमधून 2 हजार मतं घेऊ शकत नाहीत, ते स्वतचा बँड वाजवून घेतात, ते आमचा बँड वाजवू शकत नाहीत हे आम्ही दाखवून दिले आहे. दारुण पद्धतीने नापास झालेल्यांनी आम्हाला बँड वाजवण्याच्या गोष्टी शिकवू नयेत. ‘हंबरडा मोर्चा‘ आणि जलील यांच्या पाठींब्यावरून त्यांनी हेच उबाठाचं हिंदुत्व आहे, असा टोला लगावला. मंत्री योगेश कदम यांच्याबद्दल बोलताना, त्यांना भविष्यात चांगली संधी मिळू नये म्हणून त्यांचेच हितचिंतक हे षडयंत्र करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मंडणगड येथे होणाऱया न्यायालयाच्या उद्घाटनाबद्दल समाधान व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालुक्यात न्यायालय होणे हे महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे, असे ते म्हणाले. या सोहळ्याला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, हायकोर्टाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, आणि हा सोहळा महाराष्ट्राच्या न्यायिक व्यवस्थेला न्याय देणारा ठरेल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.