संगमेश्वर तालुक्यातील अनेक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्यासह नदीला पूर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धोकादायक भाग असलेल्या तालुक्यातील कुचांबे, शेनवडे आणि गोळवली परिसरातील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

कुचांबे कोंडभैरव येथील महिपत दुडे यांच्या घरावर रविवारी दरड कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, स्थानिक प्रशासनाने तत्काळ दुडे यांच्या घरासह तीन घरांतील कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. घटनेनंतर श्याम काजवे, काशीराम लाखन, माजी पोलीस दुडे, चंद्रकांत कदम, आत्माराम भोमकर, दिनेश राक्षे, सुहास पंडव, तुकाराम बागवे आणि सुनील लाखन यांनी घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम हाती घेतले.

शेनवडे गावातही पूरस्थितीने थैमान घातले असून, सरपंच दत्ताराम लाखन यांच्या घरासह इतर घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेत नायब तहसीलदार गोताड यांच्या सूचनेनुसार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख संतोष थेराडे यांनी कुचांबे, शेनवडे, गोळवली या पूरग्रस्त ठिकाणांना भेट देत पाहणी केली. गोळवली येथून देखील तीन कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासनाच्या मदतीने पूरग्रस्तांना आवश्यक मदत पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.