रत्नागिरी:- कोरोनातून पर्यटन व्यवसायाला उभारी मिळत असून संकष्टी चतुर्थीला बाप्पा पावला आहे. संकष्टीबरोबरच जोडून आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटन स्थळी पर्यटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. दिवसभरात सात हजाराहून अधिक पर्यटकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. किनार्यावरही पर्यटकांची प्रचंड गर्दी होती.
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होऊ लागला असून राज्य शासनानेही निर्बंध शिथिल केले आहे. पुर्वीप्रमाणे राज्यातील व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास नुकतीच परवानगी मिळाली आहे. कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरु झाली होती. पण काही निर्बंध कायम होते. त्यामधूनही सुटका मिळाल्याने पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. मागील दोन-तिन आठवड्यात सुट्टीच्या दिवशीही कोकणातील किनार्यावर माफक गर्दी होती. रत्नागिरीतील प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटन स्थळीही पर्यटकांकडून म्हणावा तासा प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र दिवाळीच्या तोंडावर पर्यटनाला सुरवात झाली आहे. रविवारी (ता. 24) संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळेत येणार्यांचा आकडा वाढला आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची पावले आपसुकच वळलेली होती. कर्नाटक, केरळमधूनही काही गाड्या पर्यटनस्थळी दाखल झाल्या होत्या. निर्बंध शिथिलतेचा हा फायदा असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. गणपतीपुळे मंदिरात सायंकाळी साडेपाच पाच वाजेपर्यंत सुमारे सात हजाराहून अधिक पर्यटकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क अत्यावश्यक केेले होते. किनार्यावरील स्टॉल धारकांना याचा फायदा झाला. हॉटेल-लॉजिंगलाही चांगले दिवस आले आहेत. पन्नास टक्केहून अधिक पर्यटकांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला आहे. आजची गर्दी पाहून कोरोना येण्यापुर्वीचे दिवस आठवल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या. गणपतीपुळेबरोबरच गुहागर, दापोलीतील किनार्यांवरही पर्यटकांचा राबता वाढला होता.