श्री भैरीदेव शिमगोत्सवास 2 मार्चपासून प्रारंभ

रत्‍नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाचा शिमगोत्सव 2 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्चपासून पालखी सहणेवर स्थानापन्न होणार असून 8 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 1 वाजता रंगपंचमी खेळण्यासाठी उठणार आहे. त्यानंतर रात्री 12 वाजता पालखी श्री देव भैरी मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी पोहचणार आहे. झाडगाव सहाणेजवळ होळीचा शेंडा येथे 3 मार्च रोजी दुपारी उभी केली जाणार आहे.

श्री देव भैरी शिमगोत्सवाच्या बैठकीतील नियोजनानुसार 2 मार्च रोजी रात्री 10 वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपरिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री 11 वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री 12 वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिराबाहेर पडेल व खालची आळी, महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल.

3 मार्चला श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात पहाटे 3 वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्राम प्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदर रोड मार्गे पहाटे 5 वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चंवडे वठार, खडपे वठार मागील समुद्र मार्गे जावून खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी 10 वाजता येईल. तेथून तेली आळी भागातून राम नाका, राम मंदिर येथे सकाळी 11.30 वाजता येईल तेथून पुढे बारा वाड्यांतर्फे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी 12 वाजता येईल. तेथून पुढे गोखले नाक्यावरुन गाडी तळावरून सहाणेजवळून मुरुगवाडा शिवलकर कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेऊन दुपारी 3 वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल, रात्री 9 वाजता श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरून निघेल व देवस्थानचे मुख्य खोत रमाकांत सांवत व संतोष सावंत यांच्या घरी पूजा होऊन धुळवड श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल. 

तेथून सावंत खोतांच्या मूळ चौकीवर जाऊन कुंभारवाड्यातून परटवणे फगरवठार येथून परत फिरून निशाण वरच्या आळीतून लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनीच्या पारावर येईल व रात्री 11.30 वा. निशाणाचे तीन भाग होतील व त्यापैकी एक भाग निशाण घेवून गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरात जातील. दुसरा भाग गोखले नाका, राधाकृष्ण नाक्यावरुन मच्छी मार्केटच्या मागील बाजूने झारणी रोड मार्गे राम नाक्यावरुन तेली आळी, ढमालणीच्या पारावरुन तिसरा भाग निघून पऱ्याची आळी, मारुती आळीतून तेली आळी व तेथून गोडीबाव नाक्यावरुन खडपेवठार येथे जाईल, तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात (1.30वा.) गाऱ्हाणे होईल व राजीवड्यात मुस्लीम मानकरी काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देवून गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरुन खडपेवठार सतीजवळून चवंडेवठार नाक्यावरुन विलणकर वाडी, श्री दत्त मंदिर नाका, घुडे वठार, मांडवी येथे रात्री थांबेल. 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मांडवीपासून पुढे सदानंदवाडी समुद्र मार्गे कुरणवाडी, सिध्देश्वर विरेश्वर चव्हाट्याजवळ गाऱ्हाणे होईल. तेथून सांब मंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग राममंदिरच्या मागील बाजूने व दुसरा भाग पुढील बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येवून तेथून पुढे भैरी मंदिर, फिशरीज फॅक्टरी जवळून विठलादेवी व तेथून मुरुगवाडा येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग झाडगाव कंपाऊंडमध्ये येईल व दुसरा भाग पंधरा माड व नंतर मुरुगवाडा येथे जावून झाडगांव सहाणेजवळील मूळ चौकीवर दुपारी 12 वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल.

4 ते 7 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत भैरीची पालखी झाडगांव सहाणेवर स्थानापन्न होईल. रात्री 10 ते 12 पालखी नाचविण्यात येईल. 7 मार्चला दु. 12 वा. पालखी मुरुगवाड्यात सहाणेवरून उठून झाडगाव मार्गे श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे मुरुगवाड्यातून पंधरा माड व रात्री 10 वा. झाडगाव सहाणेवर येईल, त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.