श्री देव भैरीबुवाला पोलीसांची सशस्त्र सलामी

रत्नागिरी:- बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी‚जुगाईच्या शिमगोत्सवाची शनिवारी रंगपंचमीने सांगता झाली. श्रीदेव भैरीबुवाच्या पालखीला झाडगाव येथील सहाणेवर सशस्त्र पोलिसांच्या सलामीनंतर पंचमी साजरी करून रात्री १० वाजता पुन्हा भैरी मंदिरात पालखी स्थानापन्न करून धुपारत व गावाचे गार्हाणे होवून शिमगा उत्सवाची सांगता झाली.

होळीच्या दिवशी श्री देव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला सुरवात झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा, पालखी नाचवणे, होळी उभी करणे,धुळवड अशा सर्व सणाचा आनंद द्विगुणित झाला होता. अशा या शिमगोत्सवानिमित्त शनिवारी श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी शनिवारी दु. १ वाजता झाडगाव येथील सहाणेवरुन उठवण्यात आली. त्यावेळी श्री देव भैरी देवस्थानचे सर्व ट्रस्टी, मानकरी, तसेच तमाम रत्नागिरीकरांची उपस्थिती होती. पालखी रंगपंचमीसाठी शहर प्रदक्षिणेला निघण्यापूर्वी पोलिस अंमलदारांनी सशस्त्र सलामी दिली.

त्यानंतर शहरातील झाडगाव वरच्या खोत वठारातून श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून, खेडसकर सांवत कंपाऊडमधून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन बाहेर जात खालच्या खोत वठारातून दुपारी ३ वाजता झाडगाव नाक्यावर नेण्यात आली. तेथून पुढे गाडीतळ येथे सायंकाळी ४ वाजता व पुढे श्रीदेवी नवलाई‚ पावणाई मंदिरात सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोहचली.
भैरी देवाची पालखी येथून पुढे शहर पोलिस ठाण्याला नेण्यात आली. धनजी नाक्यावरून, राधाकृष्ण नाक्यावर सायंकाळी ६.३० वा.च्या दरम्यान, पुढे राम नाका, राम मंदिर येथे सायंकाळी ७ वा. गेली. त्याठिकाणहून पुढे मारुती आळी, गोखले नाक्यावरून ढमालनीच्या पारावर रात्रौ ९ वा.च्या दरम्यान, तेथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे रात्रौ १० वाजण्याच्या दरम्यान पालखी नेण्यात आली. पुढे खालची आळीमार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्रौ ११.३० वाजेपर्यत नेण्यात येउन रात्रौ १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. त्यानंतर धुपारत व गावाचे गार्हाणे होवून या शिमगा उत्सवाची सांगता करण्यात आली.