खेड:- शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा भाजावळ करत असताना चक्कर येऊन आगीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील निळीक गावात घडली आहे. बशीर महामूद चौगुले (वय ६५ वर्षे) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. निळीक येथील रहिवासी असलेले बशीर चौगुले हे गावातील ‘खलाटी’ नावाच्या आपल्या शेतात भाजावळीच्या कामासाठी गेले होते. उन्हाचा कडाका मोठा असल्याने भाजावळ करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते पेटवलेल्या आगीत कोसळले.
बशीर चौगुले आगीत पडल्यामुळे त्यांचे कपडे आणि शरीर गंभीर भाजले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे. या घटनेमुळे निळीक परिसरात आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.









