शेतकऱ्यांना दिलासा; खतावर मिळणार अनुदान 

रत्नागिरी:- वाढत्या इंधन आणि अन्य खर्चाने महागाईने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आता दिलासा देण्यासाठी शासनाने खताच्या वाढलेल्या किमतीवर अनुदान देण्याची तयारी केली आहे. खताच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना खतासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्याचा लाभ रब्बीसह आगामी खरीप हंगामतही होणार आहे.

खतांच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाली आहे. पण आता शासनाने फॉस्फेट आणि पोटॅश खतांच्या किमती न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच शेतकर्‍यांना दिलासा देताना या दोघांवरही सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2021-22 च्या संपूर्ण वर्षासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.  फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांवरील अनुदान प्रति बॅग 438 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी 28 हजार 655 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी खतांसाठी पोषण आधारित सबसिडी मंजूर केली आहे. यामुळे शेतकर्‍यांना रब्बी पिकांच्या पेरणीसाठी परवडणार्‍या किमतीत खते उपलब्ध होण्यास मदत होईल.