भाजपचा आरोप; चिंचखरी गटशेतीसाठी 50 लाख
रत्नागिरी:- शेतकर्यांच्या विकासाचा प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती; मात्र जिल्हाधिकार्यांना मुंबईत बोलावून घेत स्थानिक मंत्र्यांनी घाणेरडे राजकारण केले, असा आरोप करत चिंचखरी येथे गटशेतीच्या प्रयोगाला मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेकडून 50 लाखाचा निधी देणार असल्याचे भाजपचे आमदार प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे नियोजन होते; मात्र जिल्ह्यात स्थानिक मंत्र्यांकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे. ते शेतकर्यांच्या विकासाआड येत असून बैठक यशस्वी होऊ नये यासाठी जिल्हाधिकार्यांना मुंबईतील बैठकीसाठी बोलावून घेतले. प्रशासनाचा आडमुठेपणा यातून दिसून आला. यावेळी हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर उपस्थित अतिरिक्त अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला आणि ते व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहीले.









