राजापूर:- तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिमला तपेंद्र बन्थोला (वय २२, मूळ रा. चौकुणे, जि. सुरखेत, नेपाळ) असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिमला ही बुधवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नारीस मालीम यांच्या आंब्याच्या बागेत बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिचे पती तपेंद्र बन्थोला हे बकऱ्या परत आणण्यासाठी बागेत गेले होते. यावेळी बिमला हिने बागेतील एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









