शिवसेनेचे खासदार असलेल्या जागांवरील उमेदवारांची यादी तयार: ना. सामंत

रत्नागिरी:- येणारी लोकसभा निवडणुक शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी महायुतीमार्फत लढविली जाईल. ज्या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, त्या जागांवर शिवसेनेने उमेदवारांची तयारी केली आहे. त्या जागा आम्ही लढवणार आहोत, परंतु जागा वाटपाचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येऊन घेतील. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेची जागा आहे. माझे बंधू किरण उर्फ भैया सामंत हे निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार असतील तर तीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित होईल असा विश्वास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामान यांनी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सन 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी महायुती मार्फतच लोकसभेच्या निवडणुका लढविल्या जातील. आता ज्या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा शिवसेना लढेल त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. शिवसेनेचे खासदार आमच्या सोबत आहेत तेथे त्यांना संधी मिळेल तर उर्वरित ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार तयार असल्याचा दावा ना. उदय सामंत यांनी केला. महायुती म्हणून जागा वाटपाचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते असेही ना. सामंत यांनी सांगितले.
राज्यभरात महायुतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्प कालावधीत मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी राज्यभर कामाचा धडाका लावला आहे. ना शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री बनले आहेत. आता सुरू असलेल्या विकास कामाचा रिझल्ट लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. जनता आमच्या सोबत आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघात अन्य कोण इच्छुक आहे याची माहिती आपल्याकडे नाही. परंतु संपूर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या आपले बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी मागणी मतदारांकडून केली जात आहे. मतदानाच्या मागणीनंतर भैय्या सामंत यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय असला तरीही ते निवडणूक रिंगणात उतरल्यास तीन लाखावर अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर कोणीही दावा केला तरी निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या संयुक्त बैठकीत जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीत केली जाणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.