Tuesday, September 15, 2026
spot_img
Home राजकीय शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी

रत्नागिरी:- महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडून 70 हजार सदस्य नोंदणी फॉर्मद्वारे करण्यात आली असून 20 जूनपर्यंत एक लाख सदस्य नोंदणी पार करण्याचा निर्धार शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोर केला आहे. ना. सामंत यांनीही मतदार संघात चांगले काम करणार्‍यांची पाठ थोपटली तरी काहींना कानपिचक्याही दिल्या.

पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते, राज्याचे ÷उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी अहिल्याबाईंना अभिवादन केले. यानंतर त्यांनी मतदार संघातील विकासकामांसह सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यात शिवसेना सदस्य नोंदणी समाधानकारक नसल्याने त्यांनी पदाधिकार्‍यांना धारेवर धरले होते. मात्र स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील प्रभाग निहाय आणि ग्रामीण भागाचा पंचायत समिती आणि विभागनिहाय आढावा घेतला.

यावेळी रत्नागिरी शहरातील माहिती शहरप्रमुख बिपीन बंदरकर आणि विभागप्रमुख व माजी नगरसेवकांकडून माहिती घेतली. शहर परिसरात सुमारे चौदा हजारहून अधिक सदस्य नोंदणीचे फॉर्म भरुन घेण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातही विभागप्रमुखांकडून आढावा घेण्यात आला. काही विभागात साडेतीन हजार हजारहून अधिक सदस्य नोंदणीचे फॉर्म भरुन घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास पंचावन्न हजारहून अधिकचे फॉर्म भरुन झाले आहेत. मागील दीड-दोन महिन्यात शिवसेनेने सत्तर हजार फॉर्म भरुन सदस्य नोंदणी केली आहे. काही सदस्य नोंदणी ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉर्मची माहिती राज्यस्तरावरुन नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर दिली जाणार आहे. ग्रामीण भागात चांगल्या पध्दतीने काम सुरु असल्याची माहिती सभागृहात तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी दिली.
शहर आणि ग्रामीण भागातून आणखी नोंदणी होणे अपेक्षित असल्याचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. 20 जून ही सदस्य नोंदणीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत एक लाखाहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ठ पदाधिकार्‍यांनी ठेवले आहे. चांगले काम करणार्‍या पदाधिकार्‍यांच्या पाठीवर ना. सामंत यांनी कौतुकाची थाप दिली. तर कामांसाठी पाठीपाठी धावणार्‍या व पक्षाच्या कामात दिरंगाई करणार्‍यांना कानपिचक्याही दिल्या.