रत्नागिरी:- मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे शिवसेना, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या तीन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय समन्वयाला सुरूवात झाली आहे. तीन पक्षांच्या प्रमुख तीन हजार पदाधिकाऱ्यांचा संकल्प मेळावा दि.14 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी शहरात होणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत या तीन राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासात्मक घोडदौड सुरू आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भविष्यात करावयाचे असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रत्नागिरी-रायगड या लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी समन्वय अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.
तिन्ही पक्षातील संपर्क अधिक मजबूत होण्याकरीता माजी आमदार प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, आमदार शेखर निकम यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी हे समन्वयक संपर्क साधणार आहेत. लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी समन्वयकांकडे नसल्याचा खुलासा ना.उदय सामंत यांनी केला.
आमदार प्रसाद लाड हे प्रमुख समन्वयक म्हणून कार्यरत राहणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील, शिवसेनेचे ना.उदय सामंत, ना.शंभूराज देसाई, ना.दादा भुसे यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीचा अधिकार या समितीकडे राहणार नाही. तिन्ही पक्षातील पदाधिकारी परिपक्व राजकारणी आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या काम करणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ‘मिशन 48’चे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा खासदार निवडून येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. अन्य घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्या सर्वांशी देखील संवाद साधण्यात येणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात हॉटेल विवेकच्या सभागृहात तिन्ही पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक संपन्न झाली. विकासकामांच्या याद्या मंजूर करणे, मागणीनुसार निधी मिळावा, विशेष कार्यकारी अधिकारी पदांची रखडलेली नियुक्ती पूर्ण करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सर्व मागण्या आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.
बैठकीला आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, सौ.पुजाताई निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाध्यक्षा सौ.सुजाता साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरूण उर्फ अण्णा कदम, शंकर कांगणे आदी मान्यवर उपस्थित होते.