रत्नागिरी:- मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या माध्यमातून शहरातील मारूती मंदिर सर्कलमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती शिल्प याचा लोकार्पण सोहळा छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनाही निमंत्रित केले असून ते उपस्थित राहिल्यास एकाच व्यासपिठावर एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटांचे राऊत येण्याच्या शक्यतेने सर्वांचे लक्ष लागले
आहे.
शासनाच्या क वर्ग पर्यटनस्थळ विकास कामाअंतर्गत मारूती मंदिर चौकाचा विकास करण्यात आला. जे. जे स्कुल ऑफ आर्टस् यांच्या संकल्पनेतून आणि मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या चौकामध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यामध्ये अनेक किल्ल्यांची प्रतिकृती, सैनिक, हत्ती आदींचा समावेश आहे. अतिशय आकर्षक अशा या शिवसृष्टीचा आणि हिंदु हृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. रत्नागिरी पालिकेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रत्नागिरी शहराच्या वैभवात आणि सौदर्यात भर पाडणाऱ्या या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.