पनवेल:– शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघाता झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहका-यांनी दिली.
विनायक मेटे हे मराठा समाजासाठी लढा देणारे नेते होते. मराठा क्रांती मुक मोर्चा आयोजनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. 2014 पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 3 जून 2016 रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे आमदार होते.