रत्नागिरी:- सोमवारी शिवजयंती निमित्त रत्नागिरीत भव्यदिव्य रॅली काढण्यात आली. क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने आयोजित या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत मराठा समाजातील तरुण आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या. या रॅलीनिमित्ताने शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.
तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंती दिनी दरवर्षी क्षत्रिय मराठा मंडळाकडून रॅलीचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे यात खंड पडला होता. यावर्षी भव्यदिव्य अशी रॅली काढण्यात आली. शहरातील जयस्तंभ येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. जयस्तंभ येथे साहसी खेळाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत बाल शिवाजीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच रॅलीच्या सुरुवातीला मशाल ठेवण्यात आली होती. रॅलीत महिलांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला होता. फेटे घातलेले तरुण आणि नऊवारी साडी नेसून महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. जयस्तंभ येथून सुरू झालेली रॅली, माळनाका येथून रात्री साडेआठच्या सुमारास मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यानजिक दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.









