रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव ग्रामंपचायतीच्या हद्दीतील उद्यमनगर येथे रस्त्याच्या मध्यभागी चिऱ्याचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी बांधकाम केल्याने रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. नवनियुक्त सरपंच रहमत काझी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच हे बांधकाम करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे रस्ता बंद झाल्याच्या ठिकाणी महिला रुग्णालय आहे. कोविड रुग्णांना देखील या ठिकाणी उपचार पुरवले जातात. असे असताना अचानक रस्त्यावर बांधकाम करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रचंड नाराज झाले आहेत. फक्त एका दिवसांत महिला रुग्णालयाच्या बाजूच्या रस्त्यावर चिऱ्याची पक्की भिंत बांधून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची व रुग्णालयात येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे.
बांधकाम करण्यात आलेली जागा रस्ता नसून ती जागा खाजगी भुखंड असल्याचा दावा जागा मालकाने केला आहे. मात्र जागा खाजगी होती तर ग्रामपंचायतने तेथे डांबरीकरण कसे केले? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नवनियुक्त सरपंच यावर लवकरच कारवाई करतील असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.









