शिक्षणाधिकारी संपात; कामकाज ठप्प

शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अभावी कामावर परिणाम

रत्नागिरी:- नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत काम आंदोलन पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही सुरूच होते. जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकार्‍यांनी काम बंद केल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. सोमवारी जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकार्‍यांनी सामुहिक रजा घेत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले. त्याचबरोबर सोमवारपासून शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे 1 श्रेणीचे अधिकारी बेमुदत संपात गेले आहेत.

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकार्‍यांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचे शासनाची परवानगी न घेता विनाचौकशी अटकसत्र सुरू केले आहे. त्यामुळे चौकशीविना अधिकार्‍यांना अटक करू नये, अशी मागणी करत शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय्य मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक राजपत्रित अधिकारी, सहभागी झाले आहेत. शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनीच आंदोलन सुरू केल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. शिक्षणमंत्री यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मंगळवारी चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. चर्चावेळी मार्ग निघाला नाही, तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी जिल्ह्यातील विस्तार अधिकार्‍यांनी सोमवारी सामुहिक रजा घेत आंदोलन केले. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देण्यात आले. मंगळवारी हे विस्तार अधिकारी कामावर रूजू झाले होते. असे असले तरी श्रेणी 1 चे सर्व अधिकारी बेमुदत संपावर गेले होते. यामुळे जिल्हापरिषदेमधील शिक्षण विभागाचा कारभार ठप्प झाला आहे.