शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियान अंमलबजावणी बैठकीत शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांमधील मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित शिक्षक आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांना आनंद देणारे, रोजगाराची संधी (भाकरी) उपलब्ध करून देणारे आणि त्यांच्यात प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे, असा विचार त्यांनी आपल्या भाषणातून मांडला.
शाळांच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबवले जात असल्याचे सांगताना शिक्षणमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या अडचणी समजून घेण्याचे आवाहन केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमधील शारीरिक हालचाल कमी होत असल्याचे सांगत, दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतींचा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विश्वविक्रम रचल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने केला.
शाळांच्या किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी शासकीय लालफितीच्या कारभारात वेळ जाऊ नये, यासाठी मोठा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. शाळा दुरुस्तीचा निधी आता थेट मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यावर वर्ग करण्याचा शासन निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवर चिंता व्यक्त करताना शाळा बंद करणे हा शासनाचा हेतू नसून दर्जेदार शिक्षण देऊन पटसंख्या वाढवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाशिममधील साखरे गावच्या जिल्हा परिषद शाळेचा दाखला देत सरकारी शाळांमध्येही खासगी शाळांपेक्षा उत्तम वातावरण निर्माण करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करून ‘आरोग्य पत्रिका’ देणे, ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ आणि ‘सुपर १००’ यांसारख्या योजना राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा मोठी असो किंवा एखाद्या झाडाखाली भरलेली, तिच्यात सकारात्मक वातावरण निर्माण करून तिचा कायापालट करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्ये असते, असे मत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्याची आठवण सांगताना त्यांनी आजच्या यशामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. संत कबीरांच्या दोह्याचा दाखला देत त्यांनी गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे सांगत शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव केला.
जिल्ह्यातील शाळांमध्ये सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून जुन्या खोल्यांचे रूपांतर सुसज्ज ग्रंथालये आणि AI तंत्रज्ञानयुक्त अध्ययन केंद्रांमध्ये (‘प्रकल्प भविष्य’) केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच डीपीडीसीच्या (DPDC) माध्यमातून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही आणि क्रीडांगणे उभारण्यासाठी सर्वंकष नियोजन केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्वतःचे आणि आपल्या मुलांचे उदाहरण देत मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने कोणताही ताण येत नसल्याचे सांगितले. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मोबाईलवर गृहपाठ देण्यास मज्जाव करण्यात आला असून परिपाठामध्ये सामूहिकरीत्या पाढे म्हणून घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी त्रिस्तरीय परीक्षा घेऊन आतापर्यंत १५० विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) तर ६० विद्यार्थ्यांना नासा (NASA) अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलींच्या आरोग्यासाठी ५५ शाळांमध्ये ‘फुलराणी कक्ष’ (सॅनिटरी नॅपकिन मशीन, इन्सिनरेटर व विश्रांती कक्ष) सुरू करण्यात आला असून, ९ ते १४ वयोगटातील १२,००० मुलींचे ‘एचपीव्ही’ (HPV) कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. पायाभूत साक्षरतेसाठी ‘मिशन आरंभ’ आणि मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी व ‘गुड टच – बॅड टच’च्या जनजागृतीसाठी ‘मिशन अभय’ अंतर्गत १० टप्प्यांचे प्रशिक्षण राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार शेखर निकम, जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील, महेश चोथे, विविध सभापती, आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी उपस्थितांचे आभार मानले.









