शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नऊ फेब्रुवारीला राज्यस्तरीय अधिवेशन

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन ९ फेब्रुवारी रोजी चेंबूर, मुंबई येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली.

या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने व सरचिटणीस शिवाजी खांडकेर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

केळकर यांनी सांगितले की, या अधिवेशनात शिक्षकतर कर्मचाऱ्यांची भरती, आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्ष्मीप्रमाणे लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील भरती, जुनी पेन्शन योजना, वैद्यकीय रजा देयके आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून, त्यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. तसेच संघटनेची पुढील ध्येय-धोरणे निश्चित करण्यात येणार आहेत. या अधिवेशनास रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकतर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, अमोल लिंगायत, मंगेश सावंत, राजू झगडे, संतोष शिंदे, उमेश दळवी, संजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.