शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील

330 शिक्षक बदलीने जाणार, रिक्त पदांची संख्या वाढणार 

रत्नागिरी:- जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 330 शिक्षक बदलीने परजिल्ह्यात जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या हजारावर पोचणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याची झळ बसणार नसली तरीही आंतरजिल्हा बदलीने पात्र ठरलेल्यांना सोडण्यात आल्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्हांतर्गत प्रशासकीय बदल्या थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरुच ठेवली आहे. अंतर्गत बदल्या सुरु असतानाच जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असलेल्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात कार्यवाही सुरु झाली आहे. राज्यातील पावणेदोन हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होतील अशी शक्यता आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे 324 तर उर्दू माध्यमाचे 6 शिक्षक आहेत. दरवर्षी आंतरजिल्हा बदल्या वादग्रस्त ठरत असतात. यंदाही तीच वेळ येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

शासनाच्या निकषानुसार दहा टक्के पेक्षा कमी रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जाण्यास परवानगी दिली जावे असे आदेश काही दिवसांपुर्वी आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. रिक्त पदांची संख्या ठरवताना सरल पोर्टलवरुन भरण्यात येणारी पदे रिक्त दाखवू नयेत असे नमुद केले आहे. जिल्ह्यात गतवर्षी सरल पोर्टलवरुन झालेल्या भरतीप्रक्रियेत सुमारे साडेतीनशे नवीन शिक्षक दाखल झाले; परंतु अजुन सुमारे पावणेतीनशे शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्या जागांवर लवकरच नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्या जागा रिक्त असल्या तरीही बदली प्रक्रियेसाठी त्या भरलेल्या दाखवण्यात येत आहे. तसे झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या साडेपाच टक्केवर आली आहे. पोर्टलमधील शिक्षकांची पदे धरुन साडेसहाशे शिक्षक आवश्यक आहेत.

या परिस्थितीत आंतरजिल्हा बदलीने 330 शिक्षकांना सोडण्यात आल्यास शिक्षकांची रिक्त पदांची संख्या एक हजारावर पोचू शकते. जिल्ह्यात पावणेतीन हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यामुळे गतवर्षी रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची वानवा निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती यंदा शाळा सुरु झाल्यानंतर होऊ शकते. गुणवत्तेअभावी पटसंख्येवर परिणाम होत असताना शिक्षकांअभावी अडचण येऊ शकते.