रत्नागिरी:- अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्यावर ५३ वर्षांवरील बदली पात्र शिक्षकांच्या बाजुने संघटनांनी राज्य शासनाकडे दाद मागितली. त्यानंतर ग्राम विकास विभागाने बदली प्रक्रियेत ज्येष्ठ शिक्षकांना दिलासा देतानाच संबंधितांसाठी पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरण्यासाठी कार्यक्रम राबविला आहे. ६ ते ८ मार्च या कालावधीत संंबंधित शिक्षकांना बदलीसाठी नकार कळवायचा आहे. जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक शिक्षक यादीत समाविष्ट आहेत.
ग्रामविभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही सुरु असून बदली प्रणालीत टप्पा १, २, ३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. तथापी अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे. अवघडमधील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी तयार केलेल्या शिक्षकांच्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या शिक्षकांचा अधिक भरणा होता. विशेष संवर्ग १ मध्ये शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे; परंतु बदली प्रक्रिया राबविताना संवर्ग १ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याबाबतचा पर्याय स्विकारला नव्हता. त्यामुळे सलग सर्वसाधारण क्षेत्रात काम केलेले अनेक शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या यादीत आले. तसेच संवर्ग १ मधील ज्या शिक्षकांची सेवा एकाच शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे, अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळण्याबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाला देण्यात आली होती. शिक्षकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन शासनाने ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही त्यांना बदलीसाठी होकार किंवा नकार देण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याची संधी दिली गेली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून कार्यक्रम जाहीर केला आहे. अवघड क्षेत्रातील १६० जागा रिक्त असून त्यासाठी शिक्षकांची यादी तयार केली होती. त्यामध्ये ८० टक्के शिक्षकांनी आपल्या नोकरीच्या कालावधीत एकदाही अवघड क्षेत्रातील शाळेत सेवा बजावलेली नाही. सर्व सेवा सर्वसाधारण क्षेत्रातच झाली आहे. त्या शिक्षकांना राज्य शासनाा दिलासा मिळाला आहे.
बदलीसाठी होकार किंवा नकार कळविण्यासाठी ६ ते ८ मार्चपर्यंत शिक्षकांना मुदत दिली आहे. भरलेल्या अर्जांची छाननी ९ ते ११ मार्चपर्यंत शिक्षणाधिकारी करतील. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारीस्तरावर १३ मार्चला केली जाईल. अवघड क्षेत्रातील रिक्त जागांचे पर्याय भरण्यासाठी शिक्षकांना १४ ते १७ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर बदलीचे आदेश २१ मार्चला प्रसिध्द होतील.