शिक्षक पदासाठी जिल्ह्यात उदासिनता; डीएडसाठी केवळ 78 अर्ज 

रत्नागिरी:- डी. एड. अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता असून यंदाही प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील केवळ ७८ जणच डीएडसाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची नोकर भरती रखडली असून खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने ही नकारात्मकता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात शासकीय व खासगी असे एकूण १२ डीएड कॉलेजेस होती. मात्र, अपुरी विद्यार्थी संख्या, प्राध्यापक वर्ग व कॉलेज व्यवस्थापनावर होणारा खर्च यांचा ताळमेळ न बसल्याने ८ विनाअनुदानित डीएड कॉलेज बंद झाली आहेत. सद्य:स्थितीत ४ कॉलेज सुरु आहेत. मागील काही वर्षांमध्ये राज्यातील शिक्षक भरती रखडली आहे. त्यामुळे अनेक डीएड पदवीधारक नोकरीपासून वंचित राहिले आहेत. अनेकांवर बेरोजगारी ओढवली आहे. स्वतः बरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी इतरत्र छोटीमोठी कामे करण्याची वेळ या पदवीधारकांवर आली आहे. तर काही डीएडधारक खासगीशिक्षण संस्थांमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असून, त्यांना कर्मचारी कपातीची टांगती तलवार डोक्यावर घेवून काम करावे लागत आहे. बेरोजगारीमळे डीएड अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या ४ डीएड कॉलेजमध्ये २४० प्रवेश क्षमता आहे. मागील दोन वर्षातील आकडेवारी पाहता या वर्षीदेखील डीएड अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसून आली. यंदाही डीएड प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. केवळ ७८ इच्छुक भावी गुरुजींनीच प्रवेश अर्ज भरले असून सद्य:स्थितीत ६० प्रवेशपूर्ण झाले आहेत. 18 सप्टेंबर रोजी तिसर्‍या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील, अशी अपेक्षा आहे