विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
रत्नागिरी:- रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अत्याधुनिक पद्धतीने सराव करता यावा, यासाठी शासनाकडून ‘स्किल लॅब’ मंजूर करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयामार्फत नुकताच यासंबंधीचा अधिकृत पुरवठा आदेश (पर्चेस ऑर्डर) जारी करण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाने २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, जालना येथील मेसर्स गस्टो फार्मा या कंपनीला या अत्याधुनिक ‘स्किल लॅब’च्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. ‘टर्न की’ तत्त्वावर ही लॅब उभारली जाणार असून, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामागे ९ कोटी ४९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. रत्नागिरीसह राज्यातील नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशाच प्रकारच्या स्किल लॅब मंजूर करण्यात आल्या आहेत. या तिन्ही लॅबसाठी एकूण २८ कोटी ४७ लाख रुपयांची भरीव तरतूद शासनाने केली आहे.
या अत्याधुनिक स्किल लॅबमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अनेक उच्च दर्जाचे सिम्युलेटर आणि मानवनिर्मित मॉडेल्स (मॅनेकिन्स) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये प्रसूतीचा सराव करण्यासाठी ‘अॅडव्हान्स बर्थिंग सिम्युलेटर’, नवजात बालकांच्या आपत्कालीन उपचारांसाठी ‘नेओनेटल रेससिटेशन ट्रेनर’, हृदयविकाराशी संबंधित उपचारांसाठी ‘कार्डियाक मॅनेकिन’, तसेच डोळ्यांच्या तपासणीसाठी ‘ऑप्थाल्मिक एक्झामिनेशन ट्रेनर’ यांसारख्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय रक्ताच्या नमुन्यांसाठी आयव्ही आर्म, त्वचेच्या शस्त्रक्रियेचे टाके घालण्याचे प्रशिक्षण देणारे मॉडेल आणि इतर वैद्यकीय प्रक्रियेचा सराव करून घेणारी तब्बल २७ प्रकारची अत्याधुनिक उपकरणे या लॅबमध्ये असतील.
या लॅबच्या उभारणीमुळे रत्नागिरीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीरावर किंवा रुग्णावर उपचार करण्यापूर्वी सिम्युलेटरच्या माध्यमातून अचूक प्रशिक्षण घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कंत्राटानुसार, देशांतर्गत उपकरणांची डिलिव्हरी ३६ आठवड्यांत तर परदेशी उपकरणांची डिलिव्हरी ४४ आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच या उपकरणांना २ वर्षांची वॉरंटी आणि त्यानंतर पुढील ८ वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची हमी दिली जाणार आहे. रत्नागिरीत अशा प्रकारची भव्य आणि आधुनिक लॅब सुरू होत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.









