रत्नागिरी:- शाळा सुरु झाल्या असून नियमित शिकवणीसाठी शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोरोनातील विविध कामांसाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांना शाळेच्या ठिकाणी हजर राहण्यास आदेश द्यावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीमार्फत जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे व जिल्हा सरचिटणीस संतोष सुर्वे यांनी केली.
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या शासन परिपत्रकानुसार सर्व आपत्कालीन आणि कोरोनासाठीच्या सेवा रद्द कराव्यात अश मागणीचे हे पत्र जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे 400 हून अधिक प्राथमिक शिक्षकांना कोरोनातील कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे.
कोरोनामुळे अपरिमित हानी झाली असून शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. याचा दुष्परिणाम विद्यार्थी, पालक, समाज व्यवस्था यांच्यावर होत आहे. कोरोनामुळे शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था बंद ठेवण्यासाठी सक्तीने निर्णय घेण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. सध्या शासनाने माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी अभियान सुरू केले आहे. त्यात शिक्षकांवर मोठी जबाबदारी दिली आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात यासाठी निर्देश दिले आहेत. प्राथमिक शाळांतील मुलांचा वयोगट व मानसिक शारीरिक क्षमता पाहता विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. मार्च 2020 पासून शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन अंर्तगत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरात विविध प्रकारच्या कोविड व अन्य प्रकारच्या कामांसाठी नियुक्ती दिली जात आहे. यामध्ये पोलीस मित्र, रेल्वे स्टेशन, नाका बंदी, तपासणी केंद्र, कोविड केंद्र, कोविड तपासणी, लसीकरण ऑन लाईन नोंदणी, ग्राम कृती दलात सहभाग, आरोग्य तपासणी, संपर्क शोध मोहीम, सर्वेक्षण, माहिती संकलन व ऑनलाईन नोंद करणे, रेशन दुकान गर्दी नियंत्रण, भरारी पथक यासह विविध ठिकाणी शिक्षकांना काम करावे लागत आहे.
शाळा सुरु झाल्यामुळे ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधणे, पाया भक्कम करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतीने शाळा स्तरावर काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 ला अध्यापन करणार्या ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या नियुक्ती तात्काळ रद्द करून सर्व शिक्षकांना पूर्णवेळ शैक्षणिक कामकाजाकडे वळवण्यात यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.