शहराच्या सुधारीत पाणी योजनेचे काम 80 टक्के पूर्ण

रत्नागिरी:- शहराच्या नव्या पाणी योजनेचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील चौदा टप्प्यातील सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. अजुनपर्यंत तीन टप्प्यातील पाणी योजनेची कामे शिल्लक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रत्नागिरी शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. प्रत्येक प्रभागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. साळवीस्टॉप ते मिर्‍यापर्यंतच्या भागात नवीन योजनेेचे काम सुरळीत व्हावे यासाठी चौदा टप्पे करण्यात आले होते. त्यापैकी अकरा टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही शहरातील खालच्या परिसरातील तिन टप्प्यातील काम पूर्ण होणे शिल्लक आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील चौदाही झोनची कामे शंभर टक्के पूर्ण होतील यादृष्टीने पालिका प्रशासनाकडून नियोजन चालू आहे. जलवाहिन्यांसाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. अजूनही तेलीआळीपासून पुढे शहराच्या अंतर्गत भागातील जलवाहिन्यांची कामे वेगाने सुरू आहेत. पाणी योजनेची ऐंशी टक्के कामे पूर्ण करण्यात आले आहे. जलवाहिन्या टाकताना राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे. दोन ते तीनवेळा पाणी सोडून पाहिले जाते. त्यामध्ये कुठे पाइपमधून पाणी बाहेर येते किंवा नाही याबाबत पाहणी केली जात आहे. यामध्ये नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून पाणीगळती लागण्याचे प्रकार ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्या दुरूस्तीकडे नगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

शहराला यापूर्वी होणारा प्रतिदिन 12 एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. पण आता नव्या पाणी योजनेच्या कामामुळे पतिदिन 18 ते 20 एमएलडी होत आहे. तसेच एमआयडीसीकडून शहरासाठी 2 एमएलडी पाणी पुरवठा घेतला जातो. पण आता मुबलक पाणीपुरवठा सुरु झाल्याने एमआयडीसीकडून घेतला जाणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.