उदय सामंत ; पालिका हद्दवाढीचे फायदे सांगणार
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेने घेतलेला हद्दवाढीचा निर्णय स्वगतार्ह आहे. पालिका ‘ड’ किंवा ‘क’ दर्जाची महापालिका होणार असेल तर चांगलेच आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील लोकांनाही चांगल्या सुविधा मिळतील. मात्र त्यासाठी यामध्ये सामाविष्ट होणार्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन त्यांना फायदे मी स्वतः पटवून देईन. मात्र त्याला विरोध असेल तर मी त्यांच्याबरोबर असेन, असे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी पालिकेने हद्दवाढीला पुन्हा हात घातला आहे. यापूर्वी देखील दहा ते बारा वर्षांपूर्वी हद्दवाढीचा प्रस्ताव सुमारे 15 किमी परिघातील 15 ग्रामपंचायतीपुढे ठेवला होता. मात्र तेव्हा महापालिका झाल्यास आपल्या करांमध्ये मोठी वाढ होईल, एवढेट त्यांच्या डोक्यात होते. मात्र त्याचा फायदे समजून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे 15 ग्रामपंचायतींनी त्याला विरोध केल्याने पालिकेचा हद्दवाढीचा हा प्रस्ताव बासनात बांधण्यात आला होता. मात्र काल (ता.13) जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पालिकेला भेट दिल्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत पुन्हा हद्दवाढीच्या विषयाला हवा दिली.
याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, पालिकेने निर्णय घेतला असला तर स्वागतच आहे. मात्र परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्याचे काय फायदे काय तोटे ते त्यांना पटवुन दिले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतो. ग्रामसभांमध्ये जाऊन मी पालिका हद्दवाढीचे फायदे पटवुन देणार आहे. शक्य होईल तेवढा माझा हद्दवाढीसाठी प्रयत्न असेल. त्यामुळे रत्नागिरी पालिका महापालिका होणार आहे. परंतु ग्रामपंचायतींनी याला विरोध केल्यास मी ग्रामस्थांच्या मागे उभा राहणार, असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.









