वैभव खेडेकरांचा आज मुंबईत भाजप पक्षप्रवेश

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यात मनसेनं मोठी कारवाई करत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या खेडेकरांनी थेट भाजपचा रस्ता धरत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यांचा प्रवेश काही कारणामुले रखडला होता. मात्र आता त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून ते आज मंगळवारी भाजप प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आगामी स्थानिकच्या तोंडावर तळ कोकणातील राजकारणात खळबळ उडवून देणारा निर्णय मनसेनं घेतला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडेकर यांच्यासह तिघांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याने हाकालपट्टीची कारवाई केली. त्यांच्या कारवाई नंतर लगेच भाजप नेते नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी फोन केला होता.

त्यामुळे ते भाजपबरोबर जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरली असून त्यांचा या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पक्ष प्रवेश होणार होता. मात्र तो रखडला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याचे नेमकं कारण काय असाही सवाल त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत होते.

दरम्यान आता खेडेकर यांचा रखडलेल्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते आज मंगळवारी भाजप प्रवेश करणार असून सर्व तयारी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा प्रवेश रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित पार पडणार असून मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर हा पक्षप्रवेश मुंबई भाजपच्या पक्ष कार्यालयात होणार आहे.

गेल्या दहा वर्षांत खेडेकर तळ कोकणाच्या राजकारणात असून त्यांची सतत पिछेहाट होताना दिसत आहे. खेड नगरपालिकेतील एकहाती सत्ता गेल्यानंतर गत निवडणुकीत खेडेकर अपक्ष निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले. मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही. यादरम्यान राज्यात झालेले सत्तांतर आणि बदललेली समिकरणांमुळे त्यांच्या विश्वासूंनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची उबाठासह इतर पक्षांची वाट धरली.

त्याचबरोबर खेडेकर यांचे नगराध्यक्षपद संपताच त्यांच्यावर 20 पेक्षा जास्त प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जे शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले होते. त्यावरून काही प्रकरणांत गुन्हेही दाखल झाले. ज्यामुळे न्यायालयाने त्यांना पालिकेची निवडणूक लढवण्यास मनाईही केली होती.

सध्याच्या घडीला ते भाजपमध्ये प्रवेश करत असून त्यामुळे त्यांना वैयक्तिक लाभ मिळेल असे नाही. पण त्यांच्या वैयक्तिक राजकीय पुनरुज्जीवनामुळे भाजपसाठी चांगलेच फायद्याचे ठरणार आहे. दरम्यान उद्या होणारा पक्ष प्रवेश फक्त चर्चा असून त्याची अधिकृत घोषणा भाजपकडून झालेले नाही.